रविवार मला आवडत नाही

( indian school love image by google )
एक काळ असा होता शाळेचा. सोमवार ते शनिवार ती दिसायची मला. रोज शाळेत जाताना , कधी वर्गात, कधी दुपारच्या सुट्टीत मैत्रिणीसोबत फिरताना, शाळेबाहेर चिंच,आवळे, बर्फाचा गोळा घेताना, शाळा सुटल्यावर असच बोरकूट घेताना दिसायची.कधी आई सोबत बाहेर गेलो तर ती तिच्या आई सोबत दिसायची. पण रविवारी ना शाळा ना क्लास. ना आई मला कुठे बाहेर घेऊन जायची. कारण रोज शाळेचा डबा करायला भाजी लागायची आई आठवड्याची भाजी एकदम आणून ठेवायची. त्यामुळे रविवारी अशी बाहेरची काम नसायची आणि असली तरी क्वचितच मला घेऊन जायची सोबत. मग काय तिला बघायला मिळायचंच नाही.
रविवारी सकाळी जाग आली कि जीव वर खाली व्हायचा. शाळा आहे अस समजून घाईत आवरायचो पण लक्षात यायचं नेमक सुट्टी दिवशी मी विनाकारण लवकर उठ्लेलो आहे. झाल म्हणजे आधीच तिला बघायला मिळणार नाही मला. आणि तिची आठवण आता आज इतकी येणार कि अख्खा दिवस मला बोर होणार आणि त्यात लवकर उठून बसलोय मी. आता अजून जास्त वेळ तिची आठवण येणार मला. मग सुरुवात होते इतरांसाठी रविवार या दिवसाची आणि माझ्यासाठी ? स्वप्नातल्या दिवसाची.
आई पोहे घेऊन येते आणि मला म्हणते, “ धर रे खा अजून लागल तर घे” माझ डोक चालत आणि मला अस वाटत इथ जर ती असती तर ? ती म्हणाली असती, “हे धर हव तितक खा,लिंबू पीळ त्यात मिरच्या खाऊ नको बाजूला काढ,शेव देऊ का अजून ? आणि कढीपत्ता खा त्यातला चांगला असतो आपल्या शरीरासाठी.” मग आई पोह्याची ताटली देऊन जाते पण ती असती तर तिने मला सगळा नाही पण पहिला घास तर भरवलाच असता.
मग नंतर मी असाच टीव्ही लाऊन त्याच्यासमोर खाटेवर बसलेलो असतो आणि एक एक रमत गमत पोह्याचा एक एक घास खातोय. खाण्यापेक्षा टीव्हीतल्या गाण्याकड माझ जास्त लक्ष लागलय. आई आत काम करतीय पण इथ ती असती तर ? तिने टीव्ही लाऊनच दिला नसता. बसली असती समोर खुर्चीवर आणि बघत बसली असती मला एकटक.
मग पोहे खाऊन झाले कि मी आत गेलो मोकळी ताटली बेसिन मध्ये ठेवून हात धुतला. आणि बसलो येऊन बाहेर पण ती असती तर ? तिने मला उठूच दिल नसत. हातातली ताटली घेऊन गेली असती आणि मला चहा आणून दिला असता. तो परिवारचा चाय मसाला टाकून.
बाहेर मित्रांसोबत उनाडक्या करताना वाटायची मजा पण ती असती तर ?आम्ही गेलो असतो दोघ कुठ तरी आड बाजूला जिथ लोकांचा वावर नाही. काही चाळे करायला नाही बर का असच फक्त बसून बोललो असतो. पण काय करणार नशीबच नाही. जी पाहिजे ती येत नाही. आणि नको असताना हे मित्र घरात येऊन जबरदस्ती बाहेर नेतात मला. आणि इतर वेळी घरात बस अभ्यास कर म्हणणारी आई आज स्वतःहून मला जा बोलते.
बाहेरून आल्यावर उन्हाच नको होत. मग जरा पंख्याखाली झोपून डोळे मिटून राहतो मी. आई विचारते जेवण वाढू का ? पण ती असती तर ? तिने केसावरून हात फिरवून माझ्या, मला प्रेम केल असत. असो.
मग जेवून करून दुपारी झोपतो मी जेणेकरून दिवस छोटा होईल पण नाहीच स्वप्नात पण तीच येते. झोप मोडेपर्यंत अगदी ती माझ्या स्वप्नात राहते. मग उठून मी आवरून चहा पितो आणि जातो तिच्या घराकडे ती दिसती का बघायला. पण छे....! दिसत नाही ती. घरात आहे कि बाहेर गेली ते पण मला समजत नाही. तिच्या घरासमोरून दोन तीन फेऱ्या मारल्या कि तिथली लोक मी चोर असल्यासारखं बघतात मग मला जास्त वेळ तिथ थांबता येत नाही. मग घरी येऊन टीव्ही बघतो मी. आणि मग तिला आठवतच मी जेवतो. आणि झोपून जातो. सकाळी जाग येते पण मला वाटत आज हि रविवार आहे. पण आज तर सोमवार आहे आणि मी मग आवरून एकशे वीसच्या स्पीडने शाळा गाठतो. तिला बघण्यासाठी. म्हणून मला कुणी विचारल तर अजूनही मी तेच सांगतो. मला सगळे दिवस आवडतात पण रविवार नाही. हा भले मी आता शाळेत जात नाही. ती मला रोज दिसत नाही. पण सवय लागलेली मला त्या वेळी तिची. आणि सवय अशीच संपत नाही ना...... पण ती अजूनही आठवते मला.


लेखक : अजिंक्य अरुण भोसले. 

1 टिप्पण्या