मोगाश.

 भाग ०१ 
रायगडपासून निघालेलेली इनोव्हा गाडी पणजीला येऊन पोचली. गाडीची चाक जी आत्तापर्यंत रस्त्यावरून धावत रस्त्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होती तीच चाकं आता रस्त्याला घट्ट धरून थांबली. कसल हे प्रेम म्हणायचं ? आठ वाजून सहा मिनिट झालेले. गाडीतला चालक संतोष उतरला. मागे बसलेले त्याचे आई बाबा पण उतरले आणि त्यांनी आजूबाजूला बघितल. एक मुलगा उन्हात उभा राहून टोक्याला टॉवेलने पुसत होता. त्याला बोलवायच्या उद्देशाने संतोष हात असा वर आणि थोडा तिरका केला,
संतोष : शुक....शुक...क.क....
अक्षर मागे वळून बघतो आणि आपल्याला बोलावतो आहे बघून तो संतोष जवळ गेला.
अक्षर : बोला ?
संतोषचे बाबा : ( पुढे सरकत ) खोली हवीय इथ रहायला. कुठे मिळेल ?
अक्षर : खोल्या असतात इथ. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस किती दिवस रहायचं आहे इथ तुम्हाला ? तस त्याच भाड पण असत.
संतोषचे बाबा : पंधरा दिवसासाठी हवीय. छोटस घर असल तरी चालेल.
अक्षर : गोवा बघायला जातात लोक. तिथ राहतात. तुम्ही इकड पणजीत ?
संतोष : घर आहे नाही सांग फक्त. आपली ओळख आहे का ?
अक्षर : नाही अजून तरी.
संतोष : मग अपेक्षा का तुला आम्ही सगळ तुला सांगाव ?
अक्षर : तस नाही. कोण येत ? कोण जात ? कुठून आल ? माहिती नको का ? उद्या काय कमी जास्त झाल आणि तुम्ही गेला तर उदया लोक माझ्याकड येतील. तेव्हा मला माहिती हवी न तुमची ?
संतोष : दहशतवादी तर असे कुटुंब घेऊन येत नाहीत ना कधी. बॉम्बस्फोट करायला. हम ?
अक्षर : मी अस कुठ म्हंटलो ? घर आहे एक माग. मस्त कौलारू. दोन खोल्या खालच्या भाड्याने दिल्यात वरच्या दोन शिल्लक आहेत. पाहिजेत का ?
संतोषचे बाबा : भाड काय ?
अक्षर : आठ हजार.
संतोषचे बाबा : महिनाभर नाही राहणार. पंधरादिवसच. आणि काम झाल तर लवकर पण जाऊ.
अक्षर : हो. पण आमच तेवढे दिवस भाड जात ना जे एक दिवस एक रात्र राहायला येतात त्याचं. खूप कमी सांगितलेत.
संतोषचे बाबा : बर. दाखव.
अक्षर : चला.
सगळे गाडीत बसायला लागले.
अक्षर : ( हसत ) इथच आहे माग. त्याला गाडी कशाला. चला चालत.
सगळे त्याच्यामागे चालायला लागले. एका घरापाशी ते सगळे येऊन थांबले. खालपासून वरपर्यंत घर बघून झाल्यावर अक्षरच्या मागे ते पुढे निघाले. दारात एक बाई बसलेली. जी तिथली भाडेकरू होती.
बाई : नवीन ?
अक्षर : हम...येता हां आव.
बाई : हम.
अक्षर : चला. सर.
सगळे वरच्या मजल्यावर गेले. खोल्या दोनच होत्या पण आवडल्या. कोकण आणि गोव्याच वातावरण कुणाला आवडत नसेल असा भारतीय तर मला माहित नाही. तर ते वातावरण आवडणाऱ्या भारतीय लोकांमधलेच ते लोक होते. त्यांना आवडल. त्यांनी जागेवर खिशातून मोजून पैसे काढले आणि अक्षरच्या हातात दिले. संतोष त्याचे आई बाबा खाटेवर बसले. अक्षर पैसे मोजून शर्टच्या वरच्या खिशात ठेवतो. खाली आल्यावर त्याला एक गोष्ट आठवते आणि म्हणून तो वर येतो.
अक्षर : सर, तुमच जेवणाच कस काय ?
संतोषची आई : हो. लागणार कि. कुठ इथ मेस आहे का ?
अक्षर : आहे कि एक नंबर आहे मेस. गोवन पद्धतीच जेवण मिळत तिथ.
संतोषची आई : होय का. किती महिन्याचे ?
त्याचं बोलण तोडत,
संतोषचे बाबा : पंधरा दिवसाचे.
अक्षर : अं..काय होतील अडीच हजार.
संतोषचे बाबा : ठीके. हे धर पैसे. पण डबा घरी येणार का जाऊन आणावा लागणार ?
अक्षर : मी आहे कि. देईन आणून.
संतोषची आई : नको नको.
संतोषचे बाबा : घेतलेत ना पैसे देईल कि आणून.
संतोषची आई : ज्यादा पैसे घेणार का तू मुला ?
अक्षर : अहो अन्न दिल्याने पुण्य मिळत. मी काय बनवणार नाही पण आणून देतोय त्यात पण पुण्य आलच कि. तुमच्या भुकेच्या वेळेला बरोबर घेऊन येईन डबा.
संतोषचे बाबा : चालेल ये.
अक्षर : येतो. आत्ता हवाय का नाष्टा ?
संतोष : आलोय खाऊन.
अक्षर : बर.
अक्षर निघून गेला आणि खाणावळीत जाऊन पोचला.
आत घरात गेल्यावर त्याला दिसल वनिता आमटीला फोडणी देत असते. त्याचा सगळा धूर होतो. ठसका लागतो. आणि अक्षर त्या धुरात वनिता शेजारी उभा राहतो. धूर कमी झाला आणि धूसर अक्षर आता स्पष्ट झाला. 
भाग ०२
वनिता एकदम दचकून जाते.
वनिता : तू इथ ?
अक्षर : हो. काम होत जरा.
वनिता : काय ?
अक्षर : हे धर पैसे.
वनिता : कसले ? त्या परवाच्या माश्याच्या थाळीचे पैसे का ?
अक्षर : नाही, नवीन कस्टमर आहे. पंधरा दिवस डबा हवाय त्यांना. दोन वेळा.
वनिता : देईन.
वनिता त्याच्याकडे बघून हसते. डोळे चमकत असतात. सगळ स्तब्ध झालेले आणि दोघ एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले. त्यात आमटीच्या फोडणीचा वास येत होता.
वनिता : कायम तू नवीन कोण आल तुझ्याकडे तर तू त्यांना माझाच डबा लावून देतोस. किती करतोस माझ्यासाठी.
अक्षर : न करून सांगायचं कुणाला ?
वनिता : का ?
अक्षर : थोड तू कमावून ठेवल थोड मी साठवून ठेवल तर आपल्यालाच बर पडेल ना उद्या लग्न करताना.
वनिता : उद्या ?
अक्षर : उद्या म्हणजे अजून वर्षभराने. आपल ठरलय ना. तुझ्या वाढदिवसादिवशी आपण आपल लग्न करायचं. म्हणजे कस लक्षात राहील आपल्या.
वनिता : हो. या वर्षीचा वाढदिवस असाच जाणार.
अक्षर : मागच्यावेळी पेक्षा भारी साजरा करू. यावेळीस ना आपण एका नवीन हॉटेलात जाऊ. आणि पुढच्यावर्षी आपण आपल्या घरात करू.
वनिता : खर ?
अक्षर : खोट प्रेमात काहीच नसत. आणि नसाव पण. बघ तू कसा साजरा करतो तुझा वाढदिवस. ते नवीन कस्टमर आलंय नेमक. त्यांच्या घर भाड्याचे पैसे आहेत आणि अजून थोडे आहेत. त्यामुळे आरामात होईल तुझा वाढदिवस असा भारी....
वनिता : चालेल. आत्ता डबा द्यायचं का ?
अक्षर : नाही. दुपारी द्यायचाय.
वनिता : चालेल. मी देते आणून तुला.
अक्षर : नको मी येतो कि.
वनिता : का मी का नको येऊ ?
अक्षर : उगीच तू उन्हात येणार. उन्हाचा त्रास होणार. वर हातात जड डबा असणार. कशाला दोन-दोन त्रास तुला. मी कशाला आहे ? मी असताना तू त्रास घेतला तर माझा उपयोग काय ?
वनिता : हो पण तू आलास तर डबा घेशील आणि जाशील.
अक्षर : हो. काम सोप्प करेन.
वनिता : मी आले तर.
अक्षर : तर ?
वनिता : तर...ते.
अक्षर : समजल. चालेल मला. ये भेटायला. त्या आमराईत ये. मी बरोबर बाराला उभा असेन.
वनिता : आणि मी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला उभी असेन.
अक्षर : येतो.
वनिता : तू नको मी येते.
अक्षर : हो-हो बर तू ये.
अक्षर निघून गेला. वनिता डबे बनवतच होती. एक डबा भरून झाला. तिची आई आली बाकीच जेवण ती बनवायला लागली. एक सकाळचा डबा देशमुखांच्या घरी जायचा. त्या घरी एक आजोबा होते त्यांना सकाळी गोळ्या खायला लागायच्या आणि त्यांना नाष्टा आवडायचा नाही. म्हणून जेवायचे ते सकाळीच. त्यांच्याकडेच डबा घेऊन जाताना वनिताला तिची मैत्रीण भेटली.
छाया : वने, वाढदिवसाला काय बेत आहे का नाही ?
वनिता : वेळ आहे अजून. आत्ताच काय ?
छाया : नाही तुम्ही दोघच करणार वाढदिवस मागच्या वेळेसारखा. आम्हाला कोण नेणार ? तुमचे आम्ही मित्र-मैत्रीण वर्षभर असतो पण वाढदिवसाला मात्र कुठ जाते मैत्री. दोघच लपून-छपून करता.
वनिता : अग तस काही नाही. ते अक्षर...मलाच काही सांगत नाही अचानक घेऊन जातो.
छाया : कुठ हि जाताना आमच्याच घरावरून जाव लागत. हाक मारून गेलात तरी येऊ आम्ही.
वनिता : अग पण.
छाया : पण तुम्ही दुसरऱ्याच रस्त्याने जाता. हो ना ?
वनिता : ए गप ना. वाढदिवसाला वीस दिवस आहेत.
छाया : आणि लग्नाला तुमच्या ?
वनिता : वर्ष तरी आहे अजून.
छाया : मुहूर्त आहे का ?
वनिता : नाही. आम्ही ठरवल आहे.
छाया : एक बुवा आहेत. त्यांना दाखवतीस का पत्रिका तुमची.
वनिता : कोण ग ?
छाया : तू नाही ओळखत त्यांना. येणार का बोल दुपारी ?
वनिता : अक्षरला विचारते.
छाया : त्याला काय विचारायचं आहे. अजून नवरा व्हायचंय त्याला तुझ.
वनिता : हो. पण आत्ता पण त्याला मी माझाच मानते.
छाया : हो न मग त्याच्यासाठीच जायचं आपण.
वनिता : बर जाऊ. आपण. मी त्याची पत्रिका पण आणते.
छाया : कितीला येणार तू ?
वनिता : सव्वा बारा.
छाया : आमराईत येते मी तू ये तिथ.
वनिता : तिथ ? तिथ नको... मी..मी येते घरी. तुझ्या.
छाया : का आमराईत का नाही ?
वनिता : आम्ही भेटणारे तिथ.
छाया : ओ....ह. भेटा कि मग मी काय पाठ करून थांबेन कि.
वनिता : नको पण. आवाज येईलच ना.
छाया : कसला ? आ ? काय करणारेस अस ?
वनिता : अग बोलण्याचा म्हणतेय.
छाया : बर करा मजा. येते मी.
वनिता : मीपण येते तुझ्याकड सव्वा बाराला लक्षात ठेव.
आणि दोघी आपापल्या रस्त्याने निघाल्या.
भाग ३
वनिता पुढे जाऊन देशमुखांच्या घरी डबा पोचवते. तिथून घरी येऊन घर आवरून वैगरे स्वतःच आवरते. घर किती अस असत आपल्या मध्यमवर्गीय लोकांच पण तरीही एखादा महाल साफ करावा इतका वेळ सकाळी घर आवरताना लागतो. आणि हि प्रत्येक घराची गोष्ट आहे. आणि म्हणून हीच गोष्ट वनिताच्या हि घराला लागू होते. तर सगळ घर आणि स्वतःच नीट आवरून होईपर्यंत अकरा वाजले. भाजी, आमटी तर झालेली. राहिलेलं काय तर भात आणि चपात्या काय आयत्या वेळेस बनवल्या जातात का तर डब्यात गरम गरम भरलेल्या चपात्या जेव्हा माणूस खातो त्या गरम चपातीने एखाद चपाती जास्त जाते. आणि त्याच पुण्य बनवणाऱ्याला लागत अस वनिताच्या आईच म्हणन होत. आणि म्हणून आता वनिता भाताचा कुकर लावते आणि इकडे कणिक मळायला घेते. इकडे अक्षर लाल टी-शर्ट वर, खाली काळी जीन्स घालून आमराईत निघाला. अजून एक तास होता बारा वाजायला. पण वनिता म्हणालेली कि अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला मी आमराईत असेन. म्हणजे ती नक्की पंधरा मिनिट आधी येईल या विचाराने अक्षर तासभरच आधी घरातून निघाला. पाच मिनिटाच्या रस्त्याला पण हा भर भर पावलाने अंतर कापत चाललेला. आमराईत आला आणि खिशात हात घालून एका झाडाला टेकून उभारला. आणि आठवल.
काय ?
तेच कि तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट. मगाशी जेव्हा तो बाजारात गेला होता तिथून त्याने अडीच ग्राम चांदीची एक अंगठी विकत आणलेली. तिच्यासाठी. नाजूक अशी ती अंगठी होती आणि वर त्यावर अमेरिकन डायमंड. खूपच छान दिसत होती ती नुसती हातात घेऊन बघताना. तीच अंगठी तिने तिच्या बोटात घातली तर तो हात बघताना किती भारी वाटेल या विचाराने त्याने तिला हि अंगठी घेतलेली. पण नेमकी तीच घरी विसरली. परत माघारी तो निघाला. येताना ज्या वेगाने तो आलेला त्याच्या दुप्पट वेगाने तो पुन्हा घरी निघाला. घरी येऊन भिंतीला अडकवलेल्या शर्टमध्ये तो बॉक्स शोधायला लागला. पण तिथ नव्हता. तिथच त्या खिशात पुन्हा पुन्हा हात घालून पण जादू काही झाली नाही. खिशात अंगठीचा बॉक्स आला नाही. आईला जाऊन विचारल.
अक्षर : आई, माझा एक बॉक्स बघितला का ग ?
आई : कसला ?
अक्षर : अग छोटाच होता.
आई : नाही. तुला कळत नाहीत का वस्तू जागेवर ठेवायच्या ? काय गेल कि यायचं विचारत आई हे बघितल का ते बघितला का ? काय काय म्हणून बघायचं मी ?
अक्षर : तू दिसल का नाहीसांग ना फक्त. मला बाकीच ऐकायला वेळ नाही.
आई : नाही म्हणाले ना.
अक्षर निघून गेला तिथून आणि पुन्हा शर्टपाशीच गेला त्याचे खिशे तपासायला लागला आणि त्याला आठवल. कि त्याने कुणाला दिसू नये म्हणून देव्हाऱ्यातल्या गणपती होता त्याच्या मागे लपवून ठेवलेला तो बॉक्स. देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती आणि एका देवीचा फोटो होता. गणपतीची मूर्ती छोटी असली तरी गणपतीची तब्येत असते तशीच ती मूर्ती होती. त्याच्या जाडजूड शरीराच्या आकाराच्या मागे त्या अंगठीचा बॉक्स अगदी आरामात लपून गेलेला. आणि अक्षरने अंघोळ झाल्यावर पहिली पूजा करून घेतलेली त्यामुळे आता त्या देव्हाऱ्यापाशी कोण जाणार नव्हत. म्हणून त्याने ती अंगठी तिथे लपवलेली. त्याला आठवल आणि जग जिंकल्यासारख त्यान त्या बॉक्सला हातात घेऊन अगदी घट्ट पकडल आणि तो पुन्हा आमराईत आला. वनिता आलेली नव्हती त्यामुळे पुन्हा एकदा जिंकल्याची भावना चेहऱ्यावर घेऊन तो उभा होता. तिकडून वनिता येताना बघून केसात हात फिरवत त्याने भांग सावराला. मुठीत तो बॉक्स धरला. ती समोर आली. ती त्याच्याकडे बघत त्याच्याकडे येत असताना ती गालात हसत त्याच्यासमोर हाजीर होत होती. ती आली. ती त्याच्यासमोर थांबली. त्याच्यासमोर डब्याची पिशवी धरली. त्याने ती एका हातात धरली आणि दुसऱ्या हाताने तिच्यापुढे तो बॉक्स धरला.
वनिता : हे काय ?
अक्षर : बघ तूच.
वनिता : अंगठी ? ? ?
अक्षर : हो तुझ्यासाठी.
वनिता : तूच घाल बोटात माझ्या.
तिने तिसर बोट त्याच्यापुढे धरल पण गंमत हि कि अंगठी बोटात जाईनाच. अंगठीचा आकार छोटा होता. त्याने तिच्याकडे बघितल.
अक्षर : तुला घेऊन जायला पाहिजे होत.
वनिता : मग सरप्राईज कसल.
अक्षर : हो पण आता घेऊन जावच लागणारे ना तुला मग आधी घेऊन गेलेलं परवडल असत ना मला.
वनिता : असुदे. तू आणलस माझ्यासाठी इतकी भारी अंगठी. तीच खूप आहे माझ्यासाठी.
अक्षर : बर चल.
वनिता : कुठ ?
अक्षर : हा डबा देता आणि तसच जाता दुकानात अंगठीचा आकार वाढवायला.
वनिता : आत्ता नको.
अक्षर : का ? काय काम आहे का घरी ?
वनिता : मला जायचंय बाहेर ?
अक्षर : कुठ ?
वनिता : ज्योतिषाकडे.
अक्षर : कशाला ?
वनिता : आपली पत्रिका दाखवायला.
अक्षर : मी येऊ ?
वनिता : नको. तू कशाला मी आणि छाया जातोय.
अक्षर : मग काय झाल ? येतो कि.
वनिता : तीन तिघडा काम बिघडा होईल.
अक्षर : ठीके मग तिला सांग नको येऊ म्हणून. त्यात काय एवढ.
वनिता : तीच नेणारे मला आणि तिलाच घरी बसवू का ?
अक्षर : बर जा. सोडून मला. असच असाव. खूप वाईट आहे जग.
वनिता : ( लाडात येऊन ) होणा. जग खूप वाईट आहे, कडू आहे.
अक्षर : हो. कारल पण गोड लागेल पण या माणसाचा स्वभाव खूप कडू आहे.
वनिता : बर मग या वाईट जगातल्या या कडू माणसाच्या ओठांचा गोड खाऊ कुणाला हवाय ?
अक्षर : मला....
भाग ०४
वनिता अक्षरला मिठी मारते. अक्षर तिला जवळ घेतो. ती बाजूला होते.
अक्षर : ते गोड खाऊ त्याच काय ?
वनिता : लग्नानंतर रोजच देणारे ना. तू पण घेशीलच कि हक्काने.
अक्षर : हो पण म्हणून आत्ता नाही का देणार ? हे चुकीच आहे बाबा, एकतर मला आत्ता सोबत घेऊन जात नाहीयेस. जातीयेस ते जातीयेस वर तू बोललेलं काहीच करत नाही याला काय अर्थ आहे ?
वनिता : अर्थ आहे अक्षर. बराच अर्थ आहे. हे सगळ कुणासाठी चाललय ? तुझ्या-माझ्यासाठीच ना. आणि तू याला बे-अर्थी म्हणतोस का ?
अक्षर : अस नाही पण तुझ्या या सगळ्या करण्यात सगळ्या धावपळीत मी कुठे नसतो हे मला, माझ्या मनाला लागत. जाणवत मला. अस नको ना की, उद्या आपण लग्न करू. आपण आपल्या घरात असू आपला संसार सुखात चाललेला असेल आणि यात वाघाचा हिस्सा तुझा असेल आणि एक मुलगा म्हणून जबाबदार नवरा म्हणून माझ कर्तव्य काहीच नसेल याला काय अर्थ आहे ?
वनिता : मी काही म्हंटल नाही तुला कि, तू कायम माझ्यासोबत राहून तू पण मी जे काय करते आपल्यासाठी त्यात सहभाग घे. मला जमेल इतक मी करेनच. बस तुझ प्रेम कायम फक्त माझ्यावरच असुदे हिच अपेक्षा आहे अक्षर. अस नको व्हायला कि मी सगळ करून तुझ माझ्यावरच प्रेमच संपून जाईल.
अक्षर : अस कस ? हा अख्खा शरीरातून श्वास निघून जाईल. पण माझ तुझ्यावरच प्रेम संपणार नाही. अग तुझ्यासाठी तर मी सगळ काही करत असतो.
वनिता : माहितीय मला. तू खूप करतो माझ्यासाठी. आणि म्हणूनच आपल्या उद्याच्या भल्यासाठी मला काहीतरी प्रयत्न करायचे आहेत. ज्याच फळ हे आपल्यासाठी गोड असेल.
अक्षर : गोड. हा ? तुझ्या त्या ओठांच्या खाऊसारखा गोड ?
वनिता : चल काहीही हा तुझ. कुठ हि काहीही. कुठ पण कसा रे तू लगेच सुरु होतो ?
अक्षर : बाय होणार हय तू माझी. मग भिऊ कशाला मी. आणि राहिला प्रश्न कुठेही माझ सुरु होण्याचा ? रोमांस हवाच न प्रेमात ? प्रेमात जसा विश्वास आणि प्रेम हव तसाच कधीही न संपणारा आणि कमी न होणारा रोमांस हवाच. आकर्षण जर का एकदा संपल तर प्रेमात मग काय उरणार ? फक्त विश्वास ? आणि विश्वासावर जग चालत ग फक्त प्रेम नाही. गाडीला नुसती चाक लावली तर ती ढकलून चालवावी लागेल. ढकलगाडी होईल त्याची. त्याला इंजिन लावल तर त्यात बसून आणि चार अजून सोबत घेऊन ती गाडी चालवता येईल वेगात. प्रेमाच पण तसच आहे. सगळे पैलू हवेत प्रेमात एकसमान. तरच प्रेम शेवटपर्यंत टिकेल. नाहीतर महिन्या-दोन महीन्याच प्रेम आजकाल असतच कि जगात. त्याला कुत्र्याएवढी किंमत तरी आहे का ?
वनिता : पण आपल प्रेम अमुल्य आहे. तुझा माझ्यावर खूप प्रेम आहे. जाणवत न मला. कळत मला.
अक्षर : हो. आहे म्हणून कळत तुला. जाणवत तुला. खोट प्रेम दिसत फक्त जाणवत नाही.
वनिता : हो. अक्षर.
अक्षर : काय ?
वनिता : मला देशील ना रे अशीच साथ कायम. माझ्याशी कधी भांडणार नाहीस न ? आणि मला सोडून नाही न जाणार ?
अक्षर : अजिबात नाही. कायम समजून घेईन मी तुला. माझ्या आयुष्यातली तू दुसरी मुलगी. पहिली आई बहिण नाही मला दुसरी तू माझी बाय.
अक्षर आणि वनिता एकमेकांच्या हातात हात घेऊन एकमेकांच्या जवळ चिटकून उभे होते. वानिताच्या केसांचा वास घेताना अक्षर डोळे मिटून होता. वनिता हि त्या धुंदीत धुंद होती. त्यात कोणतरी हळूच वानिताच्या मागे जाऊन वनिताला हात लावते. वनिता खूप म्हणजे खूप घाबरून अक्षर पासून मागे होते. अक्षर हि थर-थर कापतो. सापडलो आपण या विचारात. अक्षर आणि वनिता बघतात तर ती छाया असते.
वनिता : अग घाबरला कि बिचारा.
छाया : हम. असुदे तुमच चालुदे. पण नंतर.
अक्षर : का तुझ काय ग पावशर. तुझ काय आमच्या मधे-मधे ?
वनिता : असुदे. जाऊदे अक्षर. काय झाल बोल ?
छाया : अग ते येणार होते ना ते आलेत.
वनिता : कोण ?
छाया : अग ते ? अस का करतेस ?
वनिता : कोण ते ?
छाया : अग ते पत्रिका.  
वनिता : ते बुआ ?
छाया : हो.
वनिता : मग अस सांगायचं ना. माहितीय याला. सांगीतलय त्याला मी सगळ.
छाया : काय ठेवत जाऊ नकोस मनात. बर का. सगळ सांगत जा आईला सांगितल्यासारख.
वनिता : आईला पण नाही सांगत मी इतक काही.
छाया : चांगलय.
वनिता : मी आणलीय पत्रिका जाता ?
छाया : हो. चल लवकर. परत गर्दी असते. लाईन लागते तिथ.
वनिता : येते अक्षर परत.
छाया : बाय अक्षर.
अक्षर : बाय वानु.
भाग ०५
दोघी त्या बुआच्या इथे आल्या. बाकीचे हि तीस एक लोक त्यांच्या समोर बसलेले. या आत आल्या आणि त्यांच्या एका शिष्याने दरवाजा बंद केला.
छाया : काय झाल ?
शिष्य : एवढ्याच लोकांच बघून महाराज निघणार आहेत गणपतीपुळ्याला.
छाया : बर झाल. बघ लवकर आलो नाहीतर सगळा घोळ झाला असता.
वनिता : हा ना. पण तो सोडत नाही. आणि मला पण त्याला सोडून जाऊ वाटत नाही. बर झाल तूच आलीस. नाहीतर अजून तिथच वेळ गेला असता.
छाया : चल जाऊन बसता.
वनिता : हो.
दोघी जाऊन बसल्या. एकेकाच भविष्य बघून झाल्यावर आता दोनच लोक राहिलेल. एक म्हणजे छाया आणि वनिता आणि अजून दोन बायका. वनिता असच त्या खोलीतले फोटो वैगरे बघत असताना डोक्यावर आणि थोडी तोंडावर ओढणी घेऊन बुआशी बोलणाऱ्या बाईचा आवाज सुरु झाला.
बाई : माझ एकावर प्रेम आहे. हि माझी मैत्रीण. हिचाच भाऊ आहे तो. ज्याच्यावर माझ प्रेम आहे.
बुआ : मग हवय काय यातून पुढे ?
बाई : आम्हाला एकत्र यायचं आहे.
बुआ : लग्न झालेलं दिसतय ?
बाई : हो. पण सुख जरा हि नाही. नुसती मुल काढून प्रेम आणि संसार चालत नाही ना. आपला संसार रेटणारी बायको तिची या सात वर्षात एकदा हि एका ओळीत तारीफ होत नसेल तिथ प्रेमाची अपेक्षा कसली ? पहिली मुलगी झाली. परत आठवत नाही मला बेडवर कधी त्यांनी जवळ घेतल आहे.
बुआ : म्हणून दुसरा ? बर ठीक आहे. नाव सांगा त्याच.
बाई : दत्ता शंकर सुकम.
बुआ : आणि तुझ ?
बाई : अपर्णा किशोर इटगेकर.
बुआ काहीतरी मंत्र म्हणतात. अपर्णा हे नाव ऐकून वनिता त्या बाईचा चेहरा बघण्याच्या तळमळीत ती असते. पण तिचा चेहरा दिसतच नाही. त्या बाईला सगळ सांगून झाल्यावर बुआ छायाला पुढे यायला खुणावतात. छाया वनिताचा हात धरून तिला पुढे नेते. ती अपर्णा आणि तिच्या सोबतची बाई उठून निघाली. अपर्णा तोंडावर अजून ओढणी ओढून घेते आणि निघून जाते. दारातला शिष्य दार उघडतो. छाया खाली बसते आणि वनितासुध्दा.
बुआ : कशी आहेस छाया ?
छाया : तुमचा आशीर्वाद आहे ना बुआ. चालल आहे सगळ नीट. हिला गरज होती. म्हणून हिला आणल. तिचा हि प्रेमाचा प्रोब्लेम आहे.
बुआ : हिने मला सांगितल सगळ. तुझ्याबद्दल.
वनिता : हि माझी आणि त्याची पत्रिका.
बुआ दोन्ही पत्रिका बघून बोलायला लागतात.
बुआ : तुमच प्रेम एकमेकांवर खूप दिसत आहे. पण लग्नाला मुहूर्त इथून पुढे सोळाव्या दिवशी आहे.
वनिता : आणि परत ?
बुआ : आयुष्यातला शेवटचा मुहूर्त आहे. तुम्हा दोघांसाठी. पुन्हा मुहूर्त नाही. केल तर आत्ता नाही तर परत होणार नाही.
छाया : पण दोघांच्या घरी अमान्य आहे. दोघांच्या घरी माहिती नाही यांच्याबद्दल. म्हणजे यांच्या प्रेमाबद्दल. त्याच्या आईला हि पसंत आहे. पण हिच्या घरी त्याच्या घराबद्दल आपलेपणा वाटत नाही. त्यात तो मावा खातो. कधी तरी दारू पितो. ते त्यांना आवडत नाही. हि मुळची इथली. ते रत्नागिरीचे इकडे स्थायीक झालेले. हिला आई वडील बहिण. तो एकुलता एक. घरी आई फक्त वडील नाहीत त्याला. सगळ विरुध्द आहे.
वनिता : मला नाही वाटत घरून परवानगी मिळेल. आणि मी मिळवेन हि काहीही करून. समजावेन आईला बाबांना. पण चौदा पंधरा दिवसात घरातल्यांना मनवून दोघांच आमच लग्न होईल अशक्य वाटत आहे.
बुआ : मी त्याचसाठी आहे ना.
छाया : हो ना.
वनिता : म्हणजे ?
छाया : अग हे टोटके वैगरे करतात. करतील काहीतरी.
बुआ : एक नारळ. अम..! त्याच्या घरी आई आणि तो. तुझ्या घरी तू, आई, वडील, बहिण. अजून दुसर कोण ?
वनिता : नाही एवढेच.
बुआ : मग एक काम कर आत्ता. जा एक नारळ, सहा लिंबू, हळद-कुंकू, काळी मिरी, सफेद भस्म, बुक्का, लाल रंगाचा पेन आणि कोरा काळ्या रंगाचा कागद आण. मग पुढे करू आपण एक टोटका.
वनिता : पण फरक पडेल का ?
बुआ : हे विज्ञान नाही. यात भावना आणि श्रध्दा हवी. अविश्वास असेल तर होणार काम हि होणार नाही.
वनिता : मी आणते.
छाया : आलेच बाबा.
बुआ : हो. पण लक्षात असुदे.
वनिता : काय ?
बुआ : या सगळ्या गोष्टी तुझ्या हातानेच आणायच्या. त्याला कुणाचा स्पर्श नको. आणि कुणाला हि कोणत हि कारण न सांगता या वस्तू आण. त्याच घर येताना लागत का ?
वनिता : हो.
बुआ : त्याच्या दारातली माती मुठभर आण. या आता.
दोघी त्यांना नमस्कार करून निघाल्या.
भाग ०६
छाया : ऐक कि, वने.
वनिता : काय ग ?
छाया : तुला नक्की करायचंय ना लग्न अक्षरशी ?
वनिता : हो मग काय म्हणून तर आले ना मी इकड तुझ्यासोबत. अस का विचारतेस ?
छाया : महाराज जे करतात ना त्याने काम शंभर टक्के होत. त्यातून माघार घेता येत नाही. उद्या तुझा विचार बदलला तर उगीच त्रास.
वनिता : नाही ग. अस काही नाही. केल तर लग्न मी अक्षरशी करणार नाही तर मला कुणी नको.
छाया : बघ तू महाराज कस काम करतात तुझ. खूप ख्याती आहे त्यांची. तुला माहितीय मध्यंतरी दिल्लीतून एक बाई आलेली त्यांच्याकडे. ती साधी बाई नव्हती. तिकडची जेलर होती ती. ती त्यांना शोधत शोधत त्यांच्याकडे आली. ती बाई जेलर होती पण लग्न होत नव्हत तीच. छत्तीस वय सुरु होत तीच. महाराजांनी टोटका केला आणि सव्वा दोन महिन्यात तीच लग्न ठरल. आत्ता मागच्या खेपेला मी त्यांना भेटले तर त्यांना माझ्याच समोर त्या बाईचा फोन आलेला. त्यांना दिवस गेलेले. महाराज बोलले मुलगी होईल म्हणून आणि मला खात्री आहे त्यांना मुलगीच होणार. तेव्हा त्यांच फोनवर बोलण झाल आणि मग त्यांनी मला सांगितल त्या बाईबद्दल.
वनिता : बर होईल बघ. त्यांनी माझ काम केल ना तर मी खरच आमच लग्न झाल्यावर मला झेपेल तस त्यांच्या कालीमाताच्या देवळाला दक्षिणा देईन.
छाया : हो. दे. बर मला सांग इकड आलोय आपण खर पण पटकन घेऊन समान निघायला हव नाहीतर कुणी बघितल ना तर अवघड होईल.
वनिता : हो. ऐक, संदीपकडे जाता आपण. त्याच्या दुकानात सगळ मिळेल. आणि तिथ कोण नसत जास्त. आपण तिथून सगळ घेऊन गायब होऊ.
छाया : चल.
दोघी संदीपच्या किरणामालाच्या दुकानात आल्या. त्याच दुकान किराणामलाच असल तरी एखाद्या मॉल सारख होत. कारण गावात कस सगळ एकाच ठिकाणी मिळत शक्यतो. कारण शहरात जाणारे लोक कमी असतात आणि त्यांच्या खेपा हि कमीच होत असतात. म्हणून संदीपने दुकानं आणि दुकानाला जोडलेलं घर तिथ हि उरलेलं समान साठवून ठेवलेलं. त्यामुळे सगळ मिळायचं तिथ. कपडे सोडून. वनिता आणि छायाला बघून संदीप खुर्चीवरून उठला.
संदीप : वहिनी, तुम्ही ? बोला कि काय पाहिजे ?
वनिता : नारळ हवाय. कितीला ?
संदीप : दहा, सतरा, बावीस. पण तुमच्यासाठी कोणता पण घ्या सगळ्यात दोन रुपये कमी.
वनिता : पाण्याचा दे ना चांगला.
संदीप : सताराचा देतो. पंधरा द्या. अक्षर आत्ताच येऊन गेला इथून.
छाया : कशाला आलेला ?
वनिता : काय घेतल त्याने ?
संदीप : वहिनी, मावा.
वनिता : अवघड आहे. बर मी सांगते ते दे पटकन. घाई आहे.
वनिता त्याला सगळी लिस्ट सांगते. तो सगळ आणून पिशवीत भरून देतो. ती पैसे काढायला पर्समध्ये पैसे बघत असते. आणि तिच्या शेजारी अक्षर उभा राहतो.
अक्षर : आलीस जाऊन तिकड ?
वनिता संदीपकडे बघते आणि पुन्हा अक्षरकडे बघते. अलगद ती डोळे बंद करून उघडते. अक्षर ओळखून जातो आणि शांत बसतो. ती संदीपला पैसे देते. छाया आणि वनिता निघायला लागतात. अक्षर हि तिच्यासोबत चालायला लागतो.
अक्षर : काय घेतलय ?
वनिता : काही नाही. मी जाते. नंतर भेटू आपण.
अक्षर : का अस वागतीयस ? सांग ना काय घेतलयस ?
छाया : मी सांगते पण नंतर. ऐक. नंतर भेट तिला आमच काम आहे आलो आम्ही जाऊन.
वनिता आणि छाया अनोळखी सारख त्याच्या पुढे भरभर चालायला लागल्या. पुन्हा त्या बुआ पाशी पोचल्या. त्यांच्या समोर बसल्या. त्यांनी नारळ घेऊन त्याच्या बाजूला लिंबू मांडून त्यावर हळद कुंकू बुक्का भस्म वैगरे टाकून मंत्र सुरु केले. पंधरा मिनिट ते सुरु होत.
बुआ : हे बघ हा एक नारळ वाहत्या पाण्यात सोडायचा. एक तिकाटन असेल तिथ ठेवायचा. हे दोन्ही करताना कुणाला दिसणार नाहीस ह्याची काळजी घायची. कुणाला सोबत न्यायचं नाही. कुणाला काही सांगायचं नाही. नारळ सोडला आणि ठेवला कि माघारी येताना मागे वळून बघायचं नाही. आणि हि लिंब. रोज एक लिंबू मोठ्या घरातल्या पाण्याच्या पिंपात पिळायला सांग त्याला. ते पाणी पिऊन त्याच्या घरचे वश होतील. हि कागदाची चिठ्ठी आज रात्री. मुहूर्त चांगला आहे. बारा नंतर त्याच्या घराजवळ जायचं. आणि एक चार पाच इंच खड्डा खाणून त्यात हि चिठ्ठी ठेवून मुजवायचा खड्डा आणि त्यावर एक जड दगड ठेवायचा. कळाल सगळ ?
वनिता : हो.
बुआ : जावा आता. निश्चिंत राहा. होणार लग्न तुझ त्याच्याशीच.
वनिता : मी नवस करते कालीमाताला. माझ लग्न झाल ना अक्षर सोबत मी त्याच्या सोबत येऊन आपल्या देवळाला आर्थिक मदत करेन.
बुआ : मातेची सेवा करणार असशील तू तर माता नक्की तुझी इच्छा पूर्ण करणार.
छाया त्यांच्या पाया पडते. ते बघून वनिता पण त्यांच्या पाया पडते. वनिता समान उचलून उठते.
छाया : बाहेर थांब आलेच मी. जरा बोलायचं आहे महाराजांशी.
वनिता : हो ये.  
थोड्यावेळाने छाया बाहेर आली. दोघी घरी निघाल्या. छाया मधूनच तिच्या घराकडे वळली. पुढे जरा आल्यावर वनिता तिच्या घरी गेली. ती पटकन तिच्या कपाटात सगळ सामान लपवून ठेवते. तिला आवाज येतो मागच्या बाजूला आई सोबत कोण तरी बोलत असत. उरलेलं काही काम आहे का म्हणून ती मागे जाते तर मागे तिच्या आईसोबत अपर्णा बोलत असते. वनिताला बघून अपर्णा कसली तरी घाई चेहऱ्यावर आणून तिथून निघून जाते. वनिताला धडकी भरते पण तीच आपल्याला घाबरून गेली या गोष्टीने ती स्वतःला शांत करते आणि आईशी बोलायला लागते.
भाग ०७
वनिता : आई, ह्या इकड कशाला आलेल्या ?
आई : अग त्या दवाखान्यात गेलेल्या. त्यांना सांगीतलय कि इतक्यात चान्स घेऊ नका म्हणून.
वनिता : कशाचा चान्स ?
आई : बाळाचा.
वनिता : बाकी नाही न काही बोलल्या ?
आई : नाही. कशाला काय बोलेल ती. ताट भर तीन. आलेच मी.
वनिता : हो. नक्की न काही बोलली नाही ती ?
आई : काय बोलतीयस ? कधी त्या कधी ती. आणि तू का इतक विचारतीस ? काय केलस का तू तिला ?
वनिता : नाही. असच.
आई : नक्की न ?
वनिता : हो. मी भरते ताट. आलेच.
वनिता आत गेली. तीन ताट जेवणाने भरून. चटई अंथरून ती पाण्याने तांबे भरून तिने ते तांबे जमिनीवर ठेवले. अक्षरच्या घरी रहायला आलेल्या नव्या भाडेकरूला द्यायला तिने दोन डबे भरले. पिशवीत डबे भरून ति आईला सांगून चप्पल घालायला लागली.
आई : ऐक वने.
वनिता : काय ?
आई : कुठ चाललीस ?
वनिता : ते नवे डबे लावलेत ते द्यायला चाललीय.
आई : मी देते. थांब.
वनिता : अग तू कुठ ? मी जाते न. तुला अजून चपात्या करायच्या आहेत ना ?
आई : हो आल्यावर करीन. मला एक काम आहे. मी जाता जाता देते.
वनिता : माझ पण काम होत.
आई : कुणाकड ?
वनिता : छायाच्या घरी जायचंय.
आई : उद्या जा. मी जाते आज.
आई पिशवी घेऊन निघून गेली. वनिता दारातच उभी होती. तीन लोक आले. त्यांना तिने आत बसायला सांगितल. अक्षर त्याच्या घराच्या दारात वनिताची वाट बघत होता. दिलेल्या वेळात दीड मिनिट उशीर झालेला. झालेल्या उशिराची शिक्षा वनिताला द्यायची म्हणून तो शिक्षा कसली द्यायची या विचाराने गालात तो लाजत होता. तेवढ्यात त्याला वनिताची आई दिसली. अंग क्षणात म्हणजे अगदी एक सेकंदामध्ये थंड झाल. हातावरची, छातीवरची सगळी केस शहारून गेली. काय कराव या विचारात त्याला त्याच उत्तर मिळाल नाही म्हणून तो फक्त मागे वळाला. तिची आई त्याच्यामागे उभी राहिली.
आई : हे धर.
अक्षर : ( मागे वळून बघत ) अ ? हम.         
आई : चपात्या लागल्या तर सांग देते मी आणून.
अक्षर : हो.
आई निघून गेली. अक्षर डबा द्यायला निघाला. दारात संतोष मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसलेला. त्याच लक्ष नाही बघून अक्षर आत त्याच्या वडिलांना डबा द्यायला जातो.­­­­­
संतोषचे वडील : अरे तू द्यायला आला ? ती मुलगी ?
अक्षर : तिची आई द्यायला आलेली. मी मग घेऊन आलो इथ डबा.
संतोषची आई : खूप छान आहे ती मुलगी.
संतोषचे वडील : हो.
अक्षर : पण तुम्ही कुठ बघितल तिला ? डबे तर मीच आणून देतो.
संतोषची आई : अरे या आधी भेटली आहे ती आम्हाला.
अक्षर : कुठ ?
संतोषचे बाबा : भेटली हे महत्वाच.
अक्षर : हम.
संतोष : ( आत येत ) तीच नाव वनिता आहे ना ?
अक्षर : हो.
संतोष : हम. ये तू.
संतोषचे बाबा : डबा न्यायला तिला पाठव.
अक्षर : हो. सर.
अक्षर निघून गेला. वनिता का भेटली नाही म्हणून बघायला तो तिच्या घराजवळ गेला. थोडावेळ थांबल्यावर तेवढ्यात घरातून ती ताट पेले आणि तांब्या घेऊन ती घासण्यासाठी सगळी भांडी घेऊन आली. ड्रमातून छोट्या बादलीने पाणी काढताना तीच पुढे लक्ष गेल. समोर लांबवर अक्षर तिला बघताना दिसला. ती आत वाकून बघते आणि पटकन त्याच्याकडे निघून जाते. दोघ एका झाडामागे थांबतात.
अक्षर : का आली नाहीस तू ?
वनिता : आईच काम होत म्हणून ती गेली डबा घेऊन मी काय करू.
अक्षर : शिक्षा भोग.
वनिता : कसली ?
अक्षर : मला वाट बघायला लागली त्याची एक. दुसरी म्हणजे तू आली नाहीस त्याची. आणि तिसरी शिक्षा.
वनिता : तिसरी पण शिक्षा का ?
अक्षर : हो. मला इथ याव लागल म्हणुन.
वनिता : बर काय आहे शिक्षा ?
अक्षर : कीस.
वनिता : रात्री.
अक्षर : आत्ताच.
वनिता : नाही.
अक्षर : ठीके मग मी जातो.
वनिता : का थांब ना ?
अक्षर : देनारेस का  ?
वनिता :  नाही. आत्ता कुठ ? दिवसा ? कुणी आपल्याला बघाव वाटत का ?
अक्षर : बर. ठीके तुझी मर्जी. जातो मी.
आणि तो निघून गेला. इकडे आई वनिताला हाक मारत असते. वनिता घराकडे निघाली.    
      

      

  

  
 ( कथेतील कोणता हि भाग लेखकाला न विचारता कोणत्याही सोशल साईटसवर किंवा मनोरंजन कार्यक्रमात वापरू नये तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई किंवा आर्थिक दंड होईल

   

1 टिप्पण्या