Rose Day 🌹


प्रतीक्षेत तिच्या मी कित्येक क्षण असेच वाया घालवले. अस म्हणतात गेलेला वेळ येणारा क्षण हा वाया घालवू नये. कारण हाच क्षण, वेळ हे आपलं आयुष्य कमी करत असत. पण तिच्यासाठी हे क्षण वेळ काय चीज आहेत ? तिची वाट बघण्यात आणि ती समोर दिसली कि तिला बघण्यात मी असे कित्येक क्षण वेळ वाया घालवले. ती माझी होऊ या अगर नाही फरक नाही पडत पण माझ्या एकतर्फी प्रेमात कुठेही कसर पडायला नको इतकंच मला वाटायचं. तिला माझं प्रेम समजेल न समजेल पण जेव्हा देव माझं हे प्रेम बघेल नशिबात असेल तर ठीकच पण नसेल तर त्याला हि तिला माझ्या नशिबात लिहायला भाग पडलं पाहिजे. खूप प्रेम करायचो मी तिच्यावर. का ? माहित नाही . हा पण माझं फक्त तिच्यावरच प्रेम आहे हे मात्र माहित होत. कुणासाठी तरी झुरुन आठवणीत तिच्या जगत रहायचं आणि आता नको हा विचार तिची आठवण अस झालं कि तिला जाऊन बघायचं एक वेगळीच मज्जा असते. 
तीच प्रेम किंवा ती माझ्या नशिबात असेल नसेल माहित नाही पण रोज रोज तिला बघण्यात मी रोज रोज एकेका दिवसाने माझं आयुष्य वाढवत होतो. लोकांचा देव वर असतो माझा तिच्यात होता. तिने ठरवलं तर माझं नशीब उजळणार होत आणि तिने नाहीच ठरवलं तर पक्का बरबाद होणार होतो. तिने ठरवलं तर तिच्या प्रेमात मी वेडा होणार होतो आणि तिने नाही ठरवलं तर रोज रोज मी मरणार होतो. म्हणजे जे देव हि करू शकत नाही ते ती करू शकणार होती फक्त माझ्यासोबत. रोज रोज तिला बघून रोज रोज आनंद घ्यायचो मी. रोज रोज तिच्यासाठी मी त्या पेठेत त्या कुठल्या तरी पांढऱ्या रंगाच्या फुलाच्या झाडाजवळ उभा रहायचो. रोज रोज तिला बघून एकटाच स्वतःशी हसायचो. रोज रोज अस वागताना माझ्या आयुष्यात काल आणि उद्या हे असले दिवस आणि दिवसाचे प्रकार असे उरलेच नव्हते. होत ते फक्त रोज रोज जगण. आणि या अशा रोज रोजच्या वाढत्या वयासोबत वाढत प्रेम उराशी बाळगून मी इतर लोकांसमोर अगदी सराईत पाकीटमरासारखा तीच हृदय आणि ती करत नसलेलं प्रेम माझ्याकडे चोरून ठेवून इथल्या लोकांच्यात वावरत होतो. रोज रोज एकच ठरवत होतो तिला प्रेमाची कबुली द्यावी. पण ती रोज रोज अशी सजून समोर यायची कि बोलायला जमायचंच नाही.
रोज रोज मग अस वाटत रहायचं ती आपली नाही झाली तर मी तरी कुणाचा होणार ? ती नसेल तर माझं कोण आहे ? रोज रोज मनाची तयारी करत करत आज रोज दिवशी रोझ डे आला. मी रोझ घेतल  विकत रोज दहाला मिळणारा रोजचा रोझ आज तीस रुपयाला झाला. आणि तिची वाट बघत थांबलो. ती आली तिच्याजवळ जाऊन मी रोझ घेऊन तिच्यासमोर उभा राहिलो. रोज रोज तिला बघून मी काय काय गमावलंय मलाच माहित नाही. एवढं मात्र नक्की कि तिच्या एकटीच्या नादात मी कित्येक लोकांशी संबंध तोडले. कमी केलेत. रोज रोज मी खाण-पिणं पण कमी केलं. उन्हात थांबून सावळा झालो. पावसात कित्येकदा भिजलोय. थंडीचा बिना स्वेटर पण उभा थांबलोय रस्त्यावर. त्या रोज रोज येणाऱ्या तिच्या आठवणीने किती मला त्रास झालाय तिला काय माहित. आणि या सगळ्या रोज रोजच्या प्रेमाच्या कष्टाच्या बदल्यात काय मिळालं मला ? माझा रिकामा हात. मी घरी आलो. या रोजदिवशी रोझ डे ला मी तिच्या आठवणीत अजून बुडालो. आणि घरी येऊन मी आवरायला घेतलं. चांगले कपडे घातले. सेंट सुद्धा मारला शर्टाला, पँटीला अगदी गळ्याला मानेला वैगरे. 
का ? कारण माझ्या प्रेमाच्या बदल्यात माझे हात आज रोझ डे ला रिकामे राहिले कारण तिने माझं रोझ घेतलं. माझी प्रतीक्षा संपली. मला प्रतीक्षा मिळाली.0 टिप्पण्या