तुझ्यासाठीच पत्र.प्रिय, सावरी....
कित्येक विचारांचा विचार करून पण उत्तर न मिळालेला एकच प्रश्न उरलाय माझ्याकडे आता. तो म्हणजे मी किती तुझ्यावर प्रेम करतो ? तस बघितल तर खूप करतो. खूप म्हणजे खूप करतो किंवा खूप सार करतो. पण किती ते शब्दात किंवा कुठल्या मापनात नाही मोजता येणार. पण तू आवडतेस मला. माझ प्रेम आहे तुझ्यावर. चंद्रापासून पृथ्वीपर्यंत जेवढ अंतर असेल तितक किंवा पृथ्वी पासून सूर्यापर्यंत असेल इतक अंतर म्हणजे माझ प्रेम आहे. पण त्या अंतराला हि शेवट आहेच म्हणा. म्हणजे पृथ्वी पासून निघाल तरी सूर्याजवळ जाऊन थांबणारच हे अंतर. माझ प्रेम न थांबणार. न संपणार आहे. मग माझ प्रेम या अंतरापेक्षा जास्त आहे. मग अ..म...म.. किती असेल बर ? माहित नाही. पण खूप आहे माझ तुझ्यावर प्रेम. तुला सुचत नसतील इतके विचार मला सुचत असतात. त्या प्रत्येक विचारात मी तुलाच शोधत असतो. आणि जसा दिवसाचा सूर्य आणि रात्रीचा चंद्र किती हि झाल तरी नजरेपासून आपल्या लपू शकत नाहीत तशीच काहीशी तू, माझ्या प्रत्येक विचारात सापडल्याशिवाय राहत नाहीस. सापडलीस जरी तू त्या विचारात तरी प्रश्न पडतो मला तू हरवलीसच कुठे आहे कि, मी तुला शोधाव ? पण तूच स्वतः म्हणतेस मी हरवली आहे तुझ्या प्रेमात, तुझ्या मनात, तुझ्या विचारात. पण एक सांगू तुला ? माणूस किंवा वस्तू ती हरवते तिथेच जिथे दुसऱ्या वस्तूंची किंवा दुसऱ्या व्यक्तींची गर्दी असते. अन एक सांगू तुला ? माझ मन मोकळ आहे. तिथे तू सोडलीस तर कुणीच नाही. मग अशा या माझ्या रिकाम्या मनात तूच एकटी वावरत आहेस. आणि मग मला सांग. अशा या मोकळ्या मनात माझ्या तू ठरवून पण हरवू कशी शकतेस ? तरी तू हरवल्याचा बहाणा कर. मी तुला शोधल्याचा हट्ट धरतो. आणि त्या गमतीत आपण खुश होऊन जाऊ...तू खूप बालिश आहेस. खुप सुंदर आहेस. खूप निरागस आणि खूप चंचल हि आहेस. तस बघायला गेल तर माझ्याकडे काही नाही. हा.. पण माझ्याकडे एक आहे. कि मी फक्त तुझा आहे. तू वाचत असलेल हे पत्र साधच वाटत असेल. पण शब्द साधे नाहीत. हे माझ तुझ्यावरच प्रेम आहे. यातला प्रत्येक शब्द न शब्द वाचणारे आता वाचतील देखील. पण हे माझे शब्द त्यातल्या माझ्या भावना फक्त तुलाच समजतील. कारण मी हे फक्त तुझ्यासाठी लिहील आहे. काल चंद्र तुझ्यासाठी मी पत्र लिहील म्हणून अर्धवटच आकाशात उगवला आणि आज हे पत्र लिहील तर तो सूर्य हि जरा माझ्यावर रागावला आहे. खोट वाटतय ? बघ ना मग दुपार झालीय तरी थंडी कमी व्हायचं नाव घेईना. हे दुसर पत्र माझ तुला माझ्याकडून. मग विचार कर अशी जर पत्र रोज तुला लिहित राहिलो तर नक्कीच एक दिवस येणारी जगबुडी जरा लवकरच येईल. तुझी मी तारीफ केलेली बघून.. खूप प्रेम आहे माझ तुझ्यावर. तुझ हि तितकच असाव इतकच वाटत. बाकी ? काहीच नाही. जास्त लिहिणार नाही. आहे तितकच बस. वाचून नेहमीसारखाच एक कॉल कर. कॉल करून काय म्हणायचं माहित तर आहेच तुला. आजच्या पत्रात ते सांगायची मला गरज वाटत नाही. असो. असच तुझ्यावर प्रेम करत राहीन. आयुष्यातला एक एक दिवस कमी करत तुझ्यावर एकेका दिवसाच जास्त प्रेम तुला देत राहीन.
तुझाच..


0 टिप्पण्या