![]() |
( image google ) |
जरा होळीच्या आगीत डोळे व्हीस्फारून बघितल तर कित्येक दुषनांची राख होताना दिसेल. पण सहज जर का बघायचं म्हणटल तर ती आग फक्त लाकडाच्या मोळीला गुरफटलेली दिसेल. अर्थ कैक आहे एकाच गोष्टीचा. पण ती गोष्टच जाणून न घेण हि आपली रीत आहे. रितीच काय त्यात ? कित्येक अशा भाकड रिती उरावर घेऊन आपण मिरवत आहे. कोण त्याला जातीच नाव देत तर कुणी विडीलजाद्यांच नाव देतो आहे. वडीलजाद्यांनी मिळवलेल्या इस्टेटीवर ऐतखाऊ मुल पराक्रमाचे झेंडे मिरवत आहे. ज्या झेंड्यांना कपडे आहेत रंगेबिरंगी पण बांधायला पक्के दांडके नाहीये. बिन बुडाचे झेंडे नुसते ते. बिनबुडाचे विचार हि आहेत आपले. उगीच बघितल आणि जज केल अस वागतोच ना आपण एखाद्या माणसासोबत ? न्यायालयातला जज सुद्धा इतक्या लवकर निकाल घेत नाही इतके आपण लवकर निकाल लाऊन मुक्त होतो.
मुक्त.. मुक्त आपण आहोत का ? तर नाही. विचारातून, समाजातून, जुन्या रिती-परंपरांतून, नात्यातून, आणि संसारातून कुणीच मुक्त नाही. होऊ शकत हि नाही. पण तरी स्वतंत्र असल्याचा आव आणून जगणारे इथे प्रत्येक चेहरे आहेत. प्रत्येक चेहऱ्याच्या तऱ्हा वेगळ्या. तऱ्हा तर माणसांच्या हि निराळ्या आहेत. सगळ करून पण काहीच न केल्याचा पेहराव चांगला जमतो या माणसाला. माणूस तसा स्वार्थीच. दुसर्यासाठी नाही पण स्वतःसाठी तरी. असावाच मुळी स्वार्थी विचार, कारण आपण स्वार्थ बघितला नाही म्हणून जगातले दुसरे स्वार्थ बघायचा त्याग करणार नाहीत. तस त्याग वृत्ती माणसाची लुप्त होत चालली आहे. लुप्त तर प्राणी पण आणि पाणी पण होत आहे. पण माणसाच लक्ष लुप्त होणाऱ्या खऱ्या प्रेमाकडे आहे. मुळात प्रेम खर किंवा खोट नसतच. आणि ज्यांनी कोणी हा शोध लावला प्रेमाच्या खऱ्या खोट्याचा मुळात त्यालाच त्याचा प्रेमावर विश्वास नसावा. प्रेम आणि विश्वास मुळीच सारखे नाहीत. दोघांच एकमेकांशी नात नाही. तरी सुद्धा का कुणास ठाऊक माझ तुझ्यावर प्रेम आहे कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे अस म्हणत जो तो प्रेमाच्या आहारी जातो.
आहारी माणूस तर गेलाच आहे. पैशाच्या. जो पैसा मोजता येतो फक्त. मोजता तर नाती सुद्धा येतात पण आकड्यांमध्ये नाही. आकड्यांची सरासरी बँकेच्या पासबुकावर फक्त चांगली दिसते. सालेरी स्लीपवर नाही. तरी सुद्धा यातून माणूस काय आणि किती जगतो. जगण्याला त्याचा पुरेसा वेळ नाही आणि कृतीला काही सुमार नाही. करत करत करत अगदी मरत येऊन मरून जातो. मरून जातो जीव नुसता पण मेलेल्या स्वप्नांचा, इच्छांचा, नात्यांचा अमरपट्टा जिवंतपणी साधा त्याला मिळत नाही.
मग होतो राग राग, होते चिड चिड, वाटतो हेवा दुसऱ्याचा. पण आपली स्थिती बदल नाही. स्थिती बदलायला विचार बदलले गेले पाहिजे. नाहीतर काही न करता सुद्धा तारखांचे आकडे बदलले जातात. पण त्यांना काही अर्थ नसतो. अर्थ तर त्या लोकांना हि नसतो जे स्वतःचा सोडून जगाचा विचार करतात. कारण जगाचा विचार करून जेव्हा स्वतःकड लक्ष जात तेव्हा हाताला करड्या सुरकुत्या, डोळ्याखाली काळ आणि केस पांढरी झालेली दिसतात. आणि तरी माणूस म्हणून पुन्हा हे बघून हाच विचार येतो मनात कि, पुढचा अगदी निवांत जगतोय जगाचा सगळा त्रास काय तो मलाच आहे. आणि म्हणूनच कि काय या कलियुगात देव कुणाला दृष्टांत देत नाही. कारण माणसाची चिंता, काळजी करायला माणूसच माणसासाठी झटत आहे. आणि देव आपला देवळात आरामात झोपत आहे....
बरोबर ना ?
लेखक : अजिंक्य अरुण भोसले.
0 Comments